रायगडमधील 336 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील 336 ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची सोडत उद्या, शुक्रवार (दि. 12) रोजी काढण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून, तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकीय चित्र या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार असल्याने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण 810 ग्रामपंचायती असून, त्यापैकी 240 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. तसेच 2026 या कालावधीत 89 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. एकूण 329 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे.
या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीनंतर हरकती व अभिप्राय नोंदविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचनेला मान्यता दिली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 8 जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील शहापूर, आंबेपूर, श्रीगाव, कुसुंबळे, पोयनाड, कुर्डूस, बेलोशी, चिंचोटी, सारळ, रांजणखार, डावली, थळ, वरसोली, रामराज, सुडकोली, मापगाव, सातिर्जे, चेंढरे, बेलकडे, कुरुळ, ढवर, काविर, बामणगाव, सहाण, वरंडे, बोरघर, चौल, आगरसुरे, झिराड, धोकवडे, रेवस, परहूर, चरी, कुरकुंडी, कोलटेंभी, ताडवागळे, मानतर्फे झिराड, सासवणे, पेझारी आणि वाघोडे या ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत काढण्यात येणार आहे.
मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार असून, आरक्षण निश्चितीनंतर अनेक ठिकाणची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार, कोणत्या इच्छुकांच्या आशा पल्लवित होणार आणि कोणाच्या राजकीय योजनांना ब्रेक लागणार, याचे चित्र आजच्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.
8 जुलैपर्यंत चालणार अंतिम प्रक्रिया
ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीनंतर संबंधितांकडून हरकती व अभिप्राय स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर प्राप्त हरकतींची छाननी करून अंतिम आरक्षण निश्चित केले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, ही प्रक्रिया 8 जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.
इच्छुकांचे आरक्षणाकडे लागले डोळे
उद्या होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, माजी सदस्य, विद्यमान पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षणाच्या स्वरूपावर अनेक गावांमधील निवडणुकीची समीकरणे अवलंबून असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ग्रामपंचायतीवर दृष्टीक्षेप
तालुके - ग्रामपंचायत संख्या
अलिबाग - 38
पेण - 26
पनवेल - 40
उरण - 14
कर्जत - 39
खालापूर - 5
रोहा - 47
सुधागड - 6
माणगाव - 26
तळा - 18
महाड - 39
श्रीवर्धन - 20
म्हसळा - 14
मुरूड - 04
–
एकूण - 336






