| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबईहून कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकलमध्ये जागेच्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी सकाळी मुंबई सीएसएमटी येथून सुटलेल्या उपनगरीय लोकलच्या लगेज डब्यात सतीश कुमार बोलामणी हे प्रवास करत होते. वांगणी रेल्वे स्थानकात काही प्रवासी डब्यात चढल्यानंतर बसण्याच्या जागेवरून त्यांच्यात वाद झाला. वांगणी ते शेलू दरम्यान हा वाद वाढत जाऊन तिघा प्रवाशांनी सतीश कुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच त्यांना मारहाण व शिवीगाळही करण्यात आली.
हल्ल्यानंतर आरोपी शेलू स्थानकात उतरून फरार झाले. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला. तपासादरम्यान उल्हासनगर, शेलू, नेरळ रेल्वे स्थानके तसेच नेरळ शहरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश एम. कलासागर, प्रज्ञा जेडगे, नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर, पोलीस उपनिरीक्षक कुरुंद, प्रवीण कड तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या जलद कारवाईमुळे गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा अवघ्या 12 तासांत उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.







