| पनवेल | प्रतिनिधी |
नविन पनवेल शहरातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धनंजय औढेकर, कार्यकारी संचालक यांच्या आदेशानुसार तसेच संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ, आणि जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता, पनवेल शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय सातपुते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पनवेल सिटी उपविभाग यांनी सेक्टर-15 येथील 33/11 केव्ही उपकेंद्रात 10 एमव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.
पनवेल शहरातील सेक्टर-7 व सेक्टर-15 या दोन्ही उपकेंद्रांमधील विद्यमान पॉवर ट्रान्सफॉर्मरवर वाढत्या भारामुळे ओव्हरलोडची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सेक्टर-15 उपकेंद्रात नवीन 10 पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवून तो यशस्वीरित्या चार्ज करण्यात आला. दुपारी 3 वाजता 11 केव्ही श्रेयस फिडरचा भार नवीन ट्रान्सफॉर्मरवर टाकण्यात आला. या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे सेक्टर-7 उपकेंद्रावरील भार कमी करण्यासाठी 11 केव्ही सेक्टर-3 व सेक्टर-5 फिडर्सचा भार देखील, नवीन ट्रान्सफॉर्मरवर घेणे शक्य होणार आहे. परिणामी श्रेयस, सेक्टर-3 व सेक्टर-5 या तीन महत्त्वाच्या फिडर्सचा भार संतुलित होऊन वीज वितरण व्यवस्थेची विश्वासार्हता, क्षमता व कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेल शहरातील हजारो ग्राहकांना अधिक दर्जेदार, स्थिर व अखंड वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून भविष्यातील वाढीव वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ही वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.







