| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
वीज निर्मितीच्या विकासासाठी जंगल आणि जैवविविधतेचा बळी जाऊ नये, या मागणीसाठी पनवेलमध्ये पर्यावरणप्रेमींनी मूक निदर्शने केली. कर्जत तालुक्यातील सैदोंगर येथे प्रस्तावित 3,000 मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी 32 हजारांहून अधिक झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली.
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निदर्शनांत विविध पर्यावरणवादी संस्था आणि निसर्गप्रेमी सहभागी झाले. पनवेल वकील संघटना, पनवेल ट्रेकर्स, नेचर फ्रेंड सोसायटी, सर्प विज्ञान संघटना आणि निसर्गमित्र संस्थेसह ठाणे, कुर्ला, मुलुंड, कर्जत व कामोठे येथील पर्यावरणप्रेमींनी वनसंपदेच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवली.
टोरंट पॉवर कंपनीचा सैदोंगर परिसरात सुमारे 13 हजार 505 कोटी रुपये खर्चाचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 233 हेक्टर वनजमीन वळवण्याचा आणि 32 हजार 490 झाडे तोडण्याचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे जंगल, वन्यजीवांचा अधिवास आणि जैवविविधतेवर संभाव्य परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. या निदर्शनांत उल्हास ठाकूर, संतोष उदरे, आर्यन उदरे, विघ्नेश पाटील, म्हस्कर भगिनी, नागेश हिरवे, प्रगती ठाकूर, सुरेश रिसबूड, धनंजय मदन, शेखर तारे, अक्षय गायकर, सेजल पाटील, वासंती थिटे, निनाद पाटील आणि प्रल्हाद बोडके यांच्यासह अनेकजण सहभागी झाले.






