| रायगड | प्रमोद जाधव |
टोरंट प्रकल्पाच्या नावाखाली कर्जत आणि भीमाशंकर परिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. वृक्ष तोडीविरोधात वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांसह स्थानिकांनी आवाज उठविला आहे. मुंबईतील लोककलाकार शाहीर बादल यांनी डफलीवर थाप मारून जंगल वाचविण्याची साद घातली आहे. शाहिरी परंपरेचा वारसा जपत त्यांनी निसर्गाचा आणि जंगलांचा नायनाट करणाऱ्या विकासाला लोककलेच्या माध्यमातून विरोध केला आहे. तिसरी पिढी रस्त्यावर उतरली असून, गावोगावी जाऊन जंगल वाचवा जनजागृती करण्याचे काम ते करीत आहेत.
जिल्ह्यातील कर्जत येथे टोरंट या खासगी प्रकल्पासाठी 32 हजार पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आली आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रासह इतर पर्यावरणप्रेमींनी निसर्गाची हानी रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलली जात आहेत. मुंबईतील शाहीर बादल यांनीदेखील आपल्या शैलीतून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून ते भीमाशंकर आणि कर्जत परिसरातील जंगल भागात वास्तव्याला आहेत. जंगल वाचविण्यासाठी त्यांनी पोवाड्यांसह डफलीचा आधार घेतला आहे. यातून जनजागृती करून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाहीर बादल यांची मुलेही या उपक्रमात सहभागी होऊन जंगल वाचविण्याची साद घालत आहेत.
शाहिर बादल हे मुंबईतील भांडूप येथील रहिवासी आहेत. गेल्या 29 वर्षापासून निसर्गाच्या आणि जंगलाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यांचे आजोबा आणि त्यानंतर वडील यांनी देखील वन संरक्षणासाठी जनजागृती केली आहे.तोच वारसा घेत विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी हानी रोखण्यासाठी त्यांनी आपल्या डफलीच्या थापातून आणि गीतांमधून जंगले वाचवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.







