। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत तालुक्यात शेतकर्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी हे अभियान राबविले जात असून एकाच दिवशी पाच मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रात अभियान राबवून 300 हुन अधिक शेतकर्यांची प्रकाराने निकालात काढली. दरम्यान या अभियानात कातकरी दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही केली जाणार असून शेतकर्यांच्या फेरफार नोंदी संदर्भाच्या नोंदी तात्काळ घालून देत प्रकाराने निकालात काढण्यात आली.या उपक्रमाची नेरळ येथे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरफार अदालतीचा शुभारंभ झाला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, निवडणूक नायब तहसीलदार अंजली पांडव, मंडळ अधिकारी संतोष जांभळे आदी उपस्थित होते. या फेरफार अदालतीमध्ये उपस्थित जनता शेतकरी पैकी अनेकांनी त्यांच्या रस्त्याबाबत, दळी प्लॉट मोजणी बाबत, आदिवासी लोकांना भूखंड मिळणे कामी तसेच आदिवासी लोकांच्या जमिनीमध्ये माथेरान डोंगर पायथ्याशी येणार्या पाण्यामुळे गाळ साचलेला आहे आदी अडचणी मांडल्या. त्यावर विक्रम देशमुख तहसीलदार कर्जत यांनी त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ई पिक पहाणी कार्यक्रम व कोव्हिड लसीकरण शंभर टक्के पुर्ण करणे कामी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी यांचे महसूल विभागानिगडीत अडचणी सोडविण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना तहसीलदार देशमुख यांनी निर्देश दिले