| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील क्ले पेव्हर ब्लॉक लावून रस्ते करण्याचे काम सुरू होते. मात्र, आश्वपाल संघटनेच्या याचिकेनंतर फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयात माथेरान शहरातील सुरू असलेली विविध 11 रस्त्यांची कामे स्थगित ठेवण्याचे आदेश होते. तेव्हापासून बंद असलेले रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने डिसेंबर 2025 मध्ये दिले होते. मात्र, नगरपरिषद प्रशासनाकडून ती कामे सुरू करण्यात आली नव्हती. अखेर महात्मा गांधी रस्ता ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या रस्त्याच्या अपूर्ण कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
माथेरानमधील धूळ विरहित रस्त्यांबाबत स्थानिक अश्वपाल संघटना, मूलनिवासी अश्वपाल संघटना तसेच अन्य दोन संघटनांनी सर्वोच्य न्यायालयात पिटिशन दाखल केले आहे. पिटिशन दाखल करून घेताना सर्वोच्य न्यायालयाने 24 फेब्रुवारी, 2023 रोजी माथेरानमधील सर्व रस्त्यांची कामे पुढील दोन महिने थांबवण्यात यावीत, असा निर्णय दिला होता. त्यानंतर लगेचच शहरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दस्तुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा साडेचार किलोमीटर लांबीचा महात्मा गांधी रस्ता, तसेच माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आणि काही कामे सुरु असलेले असे 11 रस्त्यांची धूळ विरहित रस्त्यात रूपांतर करण्याची कामे थांबवण्यात आली होती. या रस्त्यांवर क्ले पेव्हर लावले जात होते.
त्यानंतर माथेरान नगरपरिषदेच्या मागणीनंतर सर्वोच्य न्यायालयाने या सर्व रस्त्यांचे धूळविरहित रस्त्यात रूपांतर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशानंतर अनेक महिने उलटले तरी रस्त्यांची कामे सुरू होत नव्हती. अखेर मंगळवारी (दि.16) माथेरान शहरातील मुख्य रस्ता असलेल्या महात्मा गांधी रोडवरील वाचनालय ते छत्रपती शिवाजी महाराज रोड या भागातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष शेलार, विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.







