भिलवले फाटा येथे डंपरची दुचाकीला जोरदार धडक
। रसायनी । प्रतिनिधी ।
चौक-कर्जत रस्त्यावर भिलवले हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत जितेश रुठे (24) रा. बीड, ता. कर्जत याचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19) सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास भिलवले फाटा जवळ चौक दिशेकडून कर्जतकडे जाणाऱ्या डंपरने कर्जतहून चौकच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार जितेश रुठे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार व चौक प्रभारी विशाल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत जितेशचा मृत्यू झाला होता. त्याचे पार्थिव रुग्णवाहिकेतून चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक प्रभारी विशाल पवार करीत आहेत.
दरम्यान, चौक-कर्जत मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, दुचाकीस्वारांच्या मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत. या मार्गावर दुभाजक नसल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे. रस्ता रुंदीकरण झाले असले तरी हा मार्ग दुपदरी की चारपदरी याबाबत स्पष्टता नसल्याचेही बोलले जात आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी जागा संपादन योग्य पद्धतीने झाले आहे का, तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या संरक्षण भिंती व अडथळ्यांची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







