30 जूनपर्यंत सकाळच्या सत्रातच वर्ग
। पनवेल/ कळंबोली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सध्या जाणवत असलेल्या तीव्र उष्णता आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक तात्पुरते बदलण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयानुसार दि. 19 जून ते 30 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा व अंगणवाड्या दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत तापमानासोबतच दमट हवामानाचा प्रभाव वाढला असून, दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा उपाय करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या बदललेल्या वेळापत्रकानुसार सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे, उष्णतेपासून सावध राहणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून, शैक्षणिक कामकाजही सुरळीत सुरू राहण्यास मदत होणार आहे.







