बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
। पनवेल/कळंबोली | प्रतिनिधी |
सुमारे 19 हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या गळतीची घटना समोर आल्याने विमानतळाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विमानतळ सुरू होऊन अवघे सहा महिने झाले असताना ही घटना घडल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये विमानातून टर्मिनलपर्यंत सामान पोहोचविणाऱ्या बॅगेज बेल्ट परिसरात छतामधून पाणी गळत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर विमानतळ प्रशासनावर टीकेची झोड उठली असून, एवढ्या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पात अशा प्रकारच्या त्रुटी कशा राहिल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना विमानतळ संचालन कंपनीने सांगितले की, ही गळती बांधकामातील दोषामुळे नसून वातानुकूलन (एसी) यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. संबंधित बिघाडाची माहिती मिळताच तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
तथापि, विमानतळासारख्या अत्याधुनिक आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये अशा घटना घडल्याने सुरक्षा, देखभाल आणि गुणवत्तेच्या निकषांबाबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी पावसाळ्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.







