शवविच्छेदनासाठी खवलीहून डॉक्टर; रुग्णांचे हाल, प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत
| नागोठणे | महेश पवार |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आणि रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सध्या अक्षरशः दयनीय झाली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून येथे एकही एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, एखादा मृतदेह शवविच्छेदनासाठी आला तर खवली (ता. सुधागड) येथील डॉक्टरांना बोलावण्याची वेळ प्रशासनावर येत आहे.
जिल्ह्यातील मध्यवर्ती आरोग्य केंद्र असलेल्या नागोठण्यात 56 गावे आणि 65 आदिवासी वाड्यांतील हजारो नागरिक उपचारासाठी येतात. गरीब, गरजू आणि आदिवासी बांधवांसाठी हे केंद्र जीवनदायिनी ठरत असतानाच येथे एमबीबीएस डॉक्टर नसणे ही गंभीर बाब मानली जात आहे. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एमबीबीएस डॉक्टरच नव्हे, तर इतरही अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या ड्युटीसाठी आवश्यक असलेले पुरुष शिपाई पदही भरले गेलेले नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या येथे दोन बीएएमएस महिला डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. मात्र, त्यांची नियुक्ती केवळ तीन महिन्यांसाठी असल्याने भविष्यातील आरोग्य सेवेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
सुरक्षेअभावी महिला डॉक्टरचा राजीनामा
रात्रपाळीत पुरुष शिपाई नसल्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे एका महिला डॉक्टरने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्रातील परिस्थिती किती गंभीर बनली आहे, याची प्रचिती येते.
आश्वासनांची खैरात; प्रत्यक्षात मात्र शून्य कारवाई
एप्रिल महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी नवीन एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती लवकरच होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही पद रिक्तच आहे. डॉ. आदित्य शिरसाट आणि डॉ. नितीन टकले यांच्या बदलीनंतर निर्माण झालेली पोकळी अद्याप भरली गेलेली नाही. विशेष म्हणजे, गडबसारख्या ग्रामीण आरोग्य केंद्रात दोन आणि खवलीसारख्या केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असताना जिल्ह्याच्या मध्यवर्ती नागोठणे आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
आरोग्य केंद्राला वाली आहे का?
सततच्या दुर्लक्षामुळे नागोठणे व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “शवविच्छेदनासाठी डॉक्टर बाहेरून आणावे लागतात, रुग्णांना तज्ज्ञ उपचार मिळत नाहीत, महिला कर्मचारी असुरक्षित आहेत; मग या आरोग्य केंद्राचा वाली कोण?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसत असून तातडीने एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करून सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रक्रिया सुरू आहे : डॉ. नेहुलकर
एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी मंत्रालयातील आरोग्य भवन स्तरावर प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियुक्त करण्यात येतील. इतर कर्मचाऱ्यांची भरती प्रशासकीय स्तरावर होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी सांगितले.
तुम्ही डॉक्टर सुचवा, आम्ही भरती करतो : भोसले
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त डॉक्टर पदाबाबत विचारणा केली असता, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी “तुम्ही डॉक्टर सुचवा, आम्ही भरती करू” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, “डॉक्टर शोधून आणण्याचे काम आता जनतेनेच करायचे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे संपूर्ण परिसरासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. येथे एमबीबीएस डॉक्टर नसणे, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न प्रलंबित राहणे आणि रिक्त पदे न भरणे हे अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने डॉक्टर नियुक्त करून आरोग्य सेवा सुरळीत करावी. अन्यथा जनआंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
समस्थ नागोठणेकर







