विक्रमी उत्पन्न मिळविणाऱ्या चालक-वाहकांचा सन्मान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग- शेगाव बसमधील चालक सचिन बावस्कर, वाहक संदीप गोसावी यांनी 15 जून रोजी एक लाख एक हजार 462 रुपयांचे उत्पन्न मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली. तसेच या फेरीत 107.88 टक्के भारमान नोंदविण्यात आले. विक्रमी महसूल मिळविल्याबद्दल रायगड एसटी प्रेमी संघटेनतर्फे चालक व वाहकांचा विशेष सत्कार करण्यात आला. एसटी सेवेच्या उत्पन्न वाढीसाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी अलिबाग आगार व्यवस्थापक तसेच रायगड एसटी प्रेमी संघटनेचे अमित कंटक, स्वप्नील भगत, संकेत पाटील आणि समीर रांजणकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग आगारातील कर्मचारी संदीप असलकर आणि रितेश पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी चालक आणि वाहक यांचे योगदान महत्त्वाचे असून, अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवा महसूल आणि प्रवासी संख्या या दोन्ही बाबतीत यशस्वी ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.







