। पनवेल । प्रतिनिधी ।
पोटच्या 16 वर्षांच्या निष्पाप मुलीवर तब्बल 10 वर्षे सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 55 वर्षीय नराधम पित्याला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नवीन पनवेल परिसरात घडलेल्या या अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेतील पीडित मुलगी 2016 मध्ये केवळ 7 वर्षांची असल्यापासून छळ सुरु होता. आरोपी घरात पीडितेच्या आईच्या अनुपस्थितीत अथवा रात्रीच्या वेळी तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता. आई घरात नसताना पीडितेच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने अश्लिल आणि घृणास्पद कृत्य करण्यास तिला भाग पाडत होता. विरोध केल्यास तिला बेदम मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या होता. घाबरुन पीडित मुलीने या कृत्याची माहिती कुणालाही दिली नाही. सन 2024 मध्ये जेव्हा पीडित मुलगी 14 वर्षांची झाली, तेव्हाही या नराधम बापाची क्रुरता थांबली नाही. घरात कोणीही नसताना नराधम बापाने तिला वारंवार मारहाण करुन, जबरदस्तीने तिच्यावर अनैसर्गिक आणि लैंगिक अत्याचार केले.
गेली 10 वर्षे सुरु असलेला हा छळ सहन न झाल्याने अखेर पीडित मुलीने लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईन या हेल्पलाईनवर संपर्क साधून त्यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या कार्यकत्यांनी पीडित मुलीसह खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तिच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून खांदेश्वर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी बापाला तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.







