| पनवेल | प्रतिनिधी।
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समित्या स्थापन करणे आणि त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याच्या प्रस्तावावर महासभेत अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रभाग समित्यांची संख्या वाढवून ती 6 करावी, अशी मागणी शेकापचे अरविंद म्हात्रे आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती; मात्र ही मागणी कायदेशीर निकषांत बसत नसल्याने सभागृहात झालेल्या मतदानाअंती 57 विरुद्ध 14 अशा बहुमताने मूळ ठराव मंजूर करण्यात आला. महासभेत सादर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, निवडणुकीसाठी पनवेल महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या 5 लाख 9 हजार 901 एवढी पटलावर दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीची लोकसंख्या 37,923 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 12,727 इतकी अंतर्भूत आहे. कायद्यातील तरतुदींनुसार, ज्या महानगरपालिकेची लोकसंख्या 6 लाखांच्या आत असते, तिथे प्रभाग समित्यांची संख्या 4 निश्चित केली जाते. एका प्रभाग समितीच्या स्थापनेसाठी साधारण दीड लाख लोकसंख्येचे परिमाण कायद्यात ठरवून दिलेले आहे. त्यामुळे पनवेलच्या सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करता 4 पेक्षा अधिक समित्या करणे नियमाबाह्य ठरत होते. सभागृहाच्या या प्रक्रियेदरम्यान विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी आणखी 2 प्रभाग समित्या वाढवून एकूण 6 समित्या कराव्यात अशी मागणी लावून धरली होती, तर इतर एका सदस्याने 1 समिती वाढवण्याची सूचना केली. परंतु, ही मागणी कायद्याच्या चौकटीत आणि नियमात बसणारी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.







