| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक एकल दिनानिमित्त एकल महिलांच्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम मंगळवारी (दि. 23) उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत त्यांच्या सन्मानाचा जागर करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने एकल महिला, बचतगट सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार मानसी पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर, विभाग प्रमुख श्रद्धा नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रभारी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ हा सन्मानजनक शब्द वापरण्याबाबतचा ठराव आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला जाणार असल्याची घोषणा केली. या घोषणेचे उपस्थित महिलांनी स्वागत केले.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी एकल महिलांनी स्वतःकडे कमीपणाच्या भावनेने पाहू नये, शासन विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत आत्मविश्वास वाढविणारे मार्गदर्शन केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी वन स्टॉप सेंटर, सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच्या वसतिगृह योजनांची माहिती दिली. नायब तहसीलदार मानसी पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महिलांच्या सन्मानाचे प्रतीक म्हणून उपस्थित एकल महिलांना तुळशीची रोपे भेट देण्यात आली. तसेच अलिबाग शहरातील दोन महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अश्रिता विजय बारसे लिखित व दिग्दर्शित ‘स्त्री शक्ती’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.
एकल महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित महिलांनी त्याचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरानी एकल दिनाचे महत्त्व पटवून देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले.







