अधिवेशनात मुद्दा गाजल्यानंतरच प्रदूषण वाढल्याने संताप
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
तळोजा औद्योगिक वसाहतीतून वाहणारी कासाडी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात रासायनिक फेस पसरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदारांनी मंगळवारी (दि. 23) कासाडी नदीतील प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी नदीत मोठ्या प्रमाणात फेस दिसून आल्याने प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित उद्योगांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कासाडी नदीतील प्रदूषण हा काही नवीन विषय नसून गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक सांडपाण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीचे पाणी काळवंडणे, दुर्गंधी पसरने, जलचरांचा मृत्यू आणि पाण्यावर रासायनिक थर तयार होणे या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, यावेळी नदीवर पसरलेल्या फेसाच्या प्रचंड प्रमाणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, काही रासायनिक कारखान्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी फेसाळून पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अधिवेशनत प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी नदीतील प्रदूषण अधिकच उघड झाल्याने यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी कासाडी नदीतील प्रदूषणासाठी जबाबदार उद्योगांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नदीतील पाण्याचे नमुने तपासून फेस निर्माण होण्यामागील नेमके कारण जाहीर करावे, अशीही मागणी होत आहे.
कासाडी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता प्रशासन केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहणार की प्रत्यक्षात दोषींवर कारवाई करणार, याकडे संपूर्ण पनवेल आणि तळोजा परिसराचे लक्ष लागले आहे. नदीच्या पाण्यावर पसरलेला हा रासायनिक फेस केवळ प्रदूषणाचे नव्हे, तर पर्यावरण संरक्षणातील अपयशाचेही प्रतीक असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कासाडी नदीतील पाण्याचे नमुने आम्ही घेतले आहेत. फेस येण्याचा घडलेला प्रकार हा नैसर्गिक आहे कि रसायनिक घटकामुळे हा प्रकार घडला आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत.
विक्रांत भालेराव,
अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ







