| चिरनेर | प्रतिनिधी |
सिडको साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळावेत यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सिडको भवन समोर दि.28 एप्रिल, 2025 पासून धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रदीर्घ आंदोलनाचा अखेर विजय झाला आहे. या आंदोलनाची दखल घेत सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्लॉट देण्याचा कार्यक्रम सिडकोने जाहीर केला आहे.
गेल्या 14 महिन्यांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सिडको आणि भूमीपुत्रांच्या साडेबारा टक्के व विकसित भूखंडाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत सिडकोने आंदोलनकर्ते माकपचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांना पत्र पाठवून सिडको कडून साडेबारा टक्के भूखंड वाटपाची सुरुवात केली असल्याचे कळविले आहे. त्यामुळे सिडकोने प्रलंबित भूखंड वाटपाचा घेतलेला निर्णय हा गेल्या 14 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या भूमीपुत्रांच्या एकजुटीचा आहे. भूमीपुत्रांनी आपल्या मागण्यांसाठी हे आंदोलन अनेक अडचणींचा सामना करीत सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला अनेक संस्था, संघटना आणि स्थानिक भूमीपुत्रांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हे लढ्याचे फळ असल्याचे मत 75 वर्षीय प्रकल्पग्रस्त आणि आंदोलक नथुराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.







