जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि.28) रायगड जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना दोन थेंब पाजून पोलिओ मुक्त रायगडच्या अभियानात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सर्वांनीच सहभाग घेतला. या मोहिमेला शहरी भागासह ग्रामीण भागातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

रायगड जिल्ह्यात एक लाख 89 हजार 27 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाभरात 2 हजार 341 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे तसेच इतर निश्चित ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देण्याचा प्रयत्न केला. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम कामगारांची वस्ती, वीटभट्ट्या, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांमध्ये विशेष पथकांद्वारे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. मोहिमेच्या पहिल्या दिवशी बूथवर लसीकरण केल्यानंतर पुढील टप्प्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस देण्यात येणार आहे.





