| उरण | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी दि.26 जून रोजी साजरा केला जातो. यावेळी अंमली पदार्थ विरोधी दिन सप्ताहनिमित्त उरणमधील मोरा सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने मंगळवारी (दि.1) करंजा नौदल आस्थापना येथील शिवाजी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालय करंजा व नौदल बाल विद्यालयातील सुमारे 520 ते 550 विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालय करंजाचे प्राचार्य राजेश कुमार आणि नौदल बाल विद्यालयाच्या प्राचार्या पायल या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल काटवानी आणि दर्शन नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंमली पदार्थांचे शरीरावर, मेंदूवर व संपूर्ण आयुष्यावर होणारे घातक दुष्परिणाम, व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब, वाढते आंतरजाल गुन्हे, महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘चांगला स्पर्श व वाईट स्पर्श’ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.







