| नवी मुंबई | प्रतिनिधी |
मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या राज्यस्तरीय संयुक्त बैठकीत सर्व संलग्न असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या एकमताने प्रकाश बाविस्कर यांची महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, प्रमोद पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत महासंघाच्या भविष्यातील संघटनात्मक विस्तार, राज्यव्यापी कार्ययोजना आणि बांधकाम उद्योगाच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महासंघाच्या कार्याला शासन, उद्योग व विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभावे या उद्देशाने आमदार प्रवीण दरेकर यांना महासंघाच्या संरक्षकपदाची, गजानन कीर्तिकर यांना प्रमुख मार्गदर्शकपदाची तसेच सतीश मगर यांना प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बांधकाम, उद्योग, कायदा, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन महासंघाची राज्यव्यापी संघटनात्मक उभारणी अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, कार्याध्यक्ष संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष अजित मराठे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, सहसचिव संदीप कोल्हटकर, खजिनदार बाबासाहेब भोसले व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, विकासक, प्रतिनिधी उपस्थित होते.







