प्रवाशांचा जीवाला गंभीर धोका; तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नागोठणे-पेझारी मार्गावर कुहिरे परिसरामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र, या बांधकामाच्या ठिकाणाहून अवजड डंपर आणि ट्रॅक्टरद्वारे मातीची वाहतूक केली जात असताना मोठ्या प्रमाणावर माती सार्वजनिक रस्त्यावर सांडत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या मातीचे रूपांतर मोठ्या चिखलात झाले असून, संपूर्ण नागोठणे-पेझारी रस्ता कमालीचा निसरडा झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी आणि विशेषतः दुचाकी वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या संदर्भात जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक खोत यांनी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अधिकृत ईमेलद्वारे पत्र पाठवून तातडीने कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी घसरून दररोज किरकोळ व गंभीर अपघात होत असून, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे एखाद्या नागरिकाला आपला जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित बांधकाम कंपनीकडून रस्त्याची नियमित साफसफाई केली जात नाही. सुरक्षिततेचा उपाय म्हणून रस्त्यावर वॉटर स्प्रिंकलर, रोड स्वीपर किंवा रिफ्लेक्टर लावलेले नाहीत, तसेच रस्ता निसरडा आहे असे सांगणारे कोणतेही चेतावणी फलक अथवा बॅरिकेडिंग लावण्यात आलेले नाही. हा निष्काळजीपणा सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असून भारतीय न्याय संहिताच्या कलम 285 अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरतो.
याठिकाणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. संबंधित दोषी कंपनीला सार्वजनिक रस्ता तात्काळ स्वच्छ ठेवण्याचे कडक आदेश द्यावेत. सुरक्षेच्या दृष्टीने मार्गावर वॉटर स्प्रिंकलर, रोड स्वीपर आणि चेतावणी फलक लावण्याचे निर्देश द्यावेत. सार्वजनिक सुरक्षेला बाधा निर्माण केल्याबद्दल जबाबदार व्यवस्थापनावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशी मागणी स्थानिक नागरिक व तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. या संवेदनशील प्रकरणी पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पावले उचलून रस्त्यावरील चिखल हटवावा आणि अपघात रोखावेत, अशी तीव्र मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे. वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.







