‘क्वीन बोट’च्या चालकाच्या धाडसाने तीन मच्छीमारांना जीवदान
| दिघी| प्रतिनिधी|
दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी खाडी परिसरात रविवारी मच्छीमारीसाठी गेलेल्या तीन मच्छीमारांवर अचानक जीवघेणा प्रसंग ओढवला. जोरदार वाऱ्यामुळे त्यांची फायबरची छोटी डिंगी (बोट) पलटी झाल्याने तिघेही समुद्रात पडले. मात्र, याचवेळी दिघी–आगरदांडा मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जंगल जेट्टी क्वीन बोटच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बचावकार्य केल्याने तिन्ही मच्छीमारांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र नारायण भुणेशवर, कृष्णा लखमा पाटील आणि प्रकाश पांडुरंग झेंगर (सर्व रा. दिघी) हे तिघे फायबरची छोटी डिंगी ( बोटी ) घेऊन दिघी खाडी परिसरात मच्छीमारीसाठी गेले होते. दरम्यान, समुद्रात वाऱ्याचा वेग अचानक वाढल्याने त्यांची डिंगी असंतुलित होऊन पलटी झाली. त्यामुळे तिघेही समुद्रात पडले आणि जीव वाचवण्यासाठी पोहत राहिले. याचवेळी दिघी ते आगरदांडा दरम्यान धावणाऱ्या जंगल जेट्टी क्वीन बोटचे चालक बाळकृष्ण गणेश पाटील (रा. कुडगाव) यांचे या घटनेकडे लक्ष गेले. त्यांनी कोणताही वेळ न दवडता बोट घटनास्थळी नेली आणि समुद्रात अडकलेल्या तिन्ही मच्छीमारांना सुरक्षितपणे बोटीत घेत किनाऱ्यावर आणले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.







