। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे एक दुर्घटना घडली. कर्जत नगरपरिषद हद्दीतील गुंडगे येथील पंचशील नगरमध्ये सोमवारी (दि.6) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कर्जत तालुक्यातील गुंडगे येथील सचिन नायकर यांच्या घराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भिंतीचे काम सुरू होते. त्यात गेल्या तीन दिवसापासून कर्जत तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे ही भिंत त्यांच्या घराच्या पत्र्यावर कोसळली. त्यामुळे भिंतीमधील सिमेंटच्या विटा घरामध्ये पडून घरातील पती, पत्नी व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष पुष्पा दगडे आणि स्थानिक नगरसेवक हर्षाली गायकवाड, माजी उप नगराध्यक्ष उमेश गायकवाड तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी झालेले सचिन नारकर आणि स्वाती नारकर यांना ढिगाऱ्या खालून काढले आणि पुढील उपचारासाठी यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेत नारकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. कर्जत नगरपरिषद आणि प्रशासनाने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.







