। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुप ग्रामपंचायती मधील भागुचीवाडी येथील एका युवकाचा मासे पकडत असताना पाण्याच्या वाढत्या प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. नामदेव पारधी रा. भागुचीवाडी असे मृत युवकाचे नाव असून, स्थानिकांनी वाहून गेलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव पारधी हा कळंब रस्त्यालगतच्या नाल्याजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. सुरुवातीला पाण्याचा वेग कमी असल्याने त्याला परिस्थितीचा अंदाज आला नाही. मात्र, मासेमारी करत असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो वाहून गेला.
घटना घडली तेव्हा नामदेव एकटाच असल्याने त्याच्या वाहून गेल्याची माहिती तत्काळ कोणालाही मिळाली नाही. सायंकाळी कळंब पुलाजवळ त्याची दुचाकी उभी असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, तो घरी परतला नसल्याने कुटुंबीय व स्थानिकांनी त्याचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो पाण्यात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोश्री नदी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर नदीकाठी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.
नामदेव पारधी हा एका सामाजिक संस्थेत सोशल वर्कर म्हणून कार्यरत होता. तो आपल्या कुटुंबाचा कर्ता सदस्य होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ आणि अन्य कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. लहान भाऊ म्हसा येथे किराणा दुकानात काम करतो, तर वडील शेतीची कामे करतात.
घरातील कर्ता पुरुष अकाली गेल्याने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भागुचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







