। नेरळ | प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ-कर्जत-कल्याण राज्यमार्गावर मुसळधार पावसामुळे लाल मातीचा मोठा मलबा वाहून आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सीमा रिसॉर्टसमोरील भूखंडातून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर काढून ठेवलेली माती पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर आल्याने मार्ग निसरडा बनला होता. नेरळ पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रित करत जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला.
नेरळच्या पंचवटी परिसरातील एका भूखंडातून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात माती काढण्यात आली होती. माती उपसा करताना माथेरान मिनी ट्रेन मार्गाखालून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक मार्गाने न वाहता मातीसह थेट राज्यमार्गावर आले.
गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर लाल मातीचा थर साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. अपघाताचा धोका लक्षात घेऊन नेरळ पोलिसांनी काही काळ वाहतूक बंद ठेवत नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मातीचा मलबा हटवून रस्ता सुरक्षित करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईवर पोलीस अधिकारी राहुल वारोटे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून देखरेख केली. त्यांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आणि वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.






