ईर्शाळवाडीची पुनरावृत्ती टळली; 213 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
| खोपोली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी दुर्घटनेची आठवण अजूनही ताजी असतानाच, खालापूर तालुक्यातील मुठा गावाजवळील ठाकूरवाडी येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाल्याने प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवत संभाव्य अनर्थ टाळला. ईर्शाळवाडीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव आणि स्थलांतर मोहीम राबवून पहिल्या टप्प्यात 52 कुटुंबांतील 213 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
ढगफुटीसदृश पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने ठाकूरवाडी परिसर धोकादायक बनला. घटनेची माहिती मिळताच खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणी सुरू असतानाच त्यांच्या समोरच पुन्हा दरड कोसळल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने संपूर्ण वाडी रिकामी करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 150 कुटुंबांतील जवळपास 500 नागरिकांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 213 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील डोंगर उतारांवर आणखी भूस्खलन होण्याचा धोका कायम असल्याने महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ईर्शाळवाडी दुर्घटनेत झालेली मोठी जीवितहानी लक्षात घेता यावेळी प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता वेळेत निर्णय घेतला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने बचाव पथके सज्ज ठेवली असून परिस्थितीवर चोवीस तास नजर ठेवण्यात येत आहे.







