अभियंत्यांसह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ॲड. राकेश पाटील यांची रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील वेलवली-खानाव येथील रस्त्यावरील भगदाडामुळे शेतकरी चांगू कमळू घरत यांचा झालेला मृत्यू हा अपघात नसून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी (दि. 10) रेवदंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, वेलवली-खानाव गावालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची लेखी सूचना ॲड. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. तसेच, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता तातडीने बंद करून वाहतूक प्रतिबंधक उपाययोजना आणि इशारा फलक उभारण्याच्या सूचना दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच चांगू घरत यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणा, कर्तव्यातील कसूर आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
ॲड. राकेश पाटील,
रस्त्यावर पडलेल्या भगदाडामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची लेखी सूचना आम्ही दोन दिवसांपूर्वीच संबंधित विभागाला दिली होती. तरीही कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नाही. हा केवळ अपघात नसून, गंभीर निष्काळजीपणाचा परिणाम आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवापेक्षा ठेकेदारांचे हित जपले जात असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन निष्पक्ष चौकशी करावी.
तक्रारदार







