खारघर मार्गावरील प्रवाशांना त्रास
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
सतत सुरू असलेल्या पावसामुळे तळोजा गावातील खारघरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर घनकचरा रस्त्यावर पसरल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता करावी तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.







