रायगडात आतापर्यंत केवळ 910 शेतकऱ्यांची नोंदणी; 31 जुलै अंतिम मुदत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी मोठे नुकसान सहन करणाऱ्या रायगडमधील शेतकऱ्यांनी यंदा मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडेच पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सुमारे 87 हजार हेक्टरवर भाताची लागवड होत असताना, आतापर्यंत अवघ्या 910 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून, केवळ 14 दिवस शिल्लक असताना अत्यल्प प्रतिसादामुळे कृषी विभागासह विमा कंपनीचीही चिंता वाढली आहे.
रायगड जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. भात आणि नाचणी ही खरीपातील प्रमुख पिके असून, दरवर्षी अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी यंदाही प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यंदा या योजनेची अंमलबजावणी इफको-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत केली जात आहे. मात्र, योजनेबाबत जनजागृती करूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. ग्रामसभा, शेतभेटी, फलक आणि विविध माध्यमांतून कृषी विभागाकडून जनजागृती केली जात असली तरी अपेक्षित नोंदणी होत नसल्याचे चित्र आहे.
यंदा पीक विम्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर ई-पीक नोंदणी आणि ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच भातासाठी प्रतिहेक्टर 650 रुपये, तर नाचणीसाठी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागत आहे. नुकसान झाल्यास भातासाठी 65 हजार रुपये, तर नाचणीसाठी 40 हजार रुपये संरक्षित विमा रक्कम मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकरी अद्याप या योजनेपासून दूर आहेत. अंतिम मुदतीस अवघे 14 दिवस उरले असताना अल्पावधीत मोठ्या संख्येने नोंदणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीक विम्याला अल्प प्रतिसाद का?
एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने विम्याचा आर्थिक भार वाढला.
नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये बदल झाल्याने अनेक शेतकरी नाराज.
पूर्वीच्या तुलनेत पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरच भरपाई निश्चित केली जात असल्याची तक्रार.
विमा मंजुरी आणि नुकसानभरपाई मिळण्यास होणारा विलंब.
किचकट नियम, डिजिटल नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत आहे.
योजनेवर दृष्टिक्षेप
अंतिम मुदत : 31 जुलै
आतापर्यंत नोंदणी : 910 शेतकरी
भात विमा हप्ता : 650 प्रति हेक्टर
भात संरक्षित रक्कम : 65,000
नाचणी विमा हप्ता : 400 प्रति हेक्टर
नाचणी संरक्षित रक्कम : 40,000







