एक हजार सीसीटीव्ही होणार कार्यान्वित; संशयित व्यक्तींच्या हालचालींवर राहणार लक्ष
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल हद्दीतील महापालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका तर्फे महत्त्वाकांक्षी सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे 142 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत महापालिका हद्दीतील शहरे आणि गावांमध्ये 1000 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, येत्या ऑगस्ट महिन्यापासून संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिका हद्दीत खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या सिडको वसाहतींसह 29 महसुली गावांचा समावेश आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, उभारले जाणारे गृहप्रकल्प आणि वाढती वर्दळ लक्षात घेता सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा उभारण्यात येत आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणानुसार मुख्य रस्ते, महत्त्वाचे चौक, सिग्नल, बाजारपेठा, उद्याने, मैदाने तसेच महापालिका हद्दीत प्रवेश आणि बाहेर पडणारे प्रमुख मार्ग येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या प्रकल्पात 360 अंशांमध्ये दृश्य टिपणारे उच्च दर्जाचे तसेच सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत स्पष्ट प्रतिमा टिपण्याची क्षमता असलेले कॅमेरे बसविण्यात येत आहेत. वादळी वाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून कॅमेऱ्यांसाठी स्वतंत्र मजबूत खांब उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांसह स्पीकरचीही व्यवस्था करण्यात येणार असून, आपत्कालीन किंवा अनुचित घटना घडल्यास नियंत्रण कक्षातून नागरिकांना तात्काळ सूचना देता येणार आहेत.
या संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेवर कामोठे येथील महापालिका नियंत्रण कक्षातून तसेच पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींचा माग काढणे अधिक सुलभ होणार आहे.
पावसाळ्यानंतर 400 कॅमेरे कार्यान्वित
पनवेल महापालिका हद्दीतील एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी परवानगीची प्रक्रिया सुरु आहे. पावसाळ्यात विद्युत खांब उभारणी आणि केबल वाहिन्या जोडताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पावसाळानंतर 400 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत.
महिला-विद्यार्थीनींची सुरक्षितता महत्त्वाची
पनवेल महापालिका हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुमारे तीन लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. दररोज हजारो महिला, विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला घराबाहेर पडतात. या परिस्थितीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी ठरणार असून, छेडछाड, चोरी, मारहाण आणि इतर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील महिला, मुली आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्प राबविण्यात येत आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
मंगेश चितळे,
आयुक्त पनवेल महापालिका.







