| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचे दर्शन घडविले. मुसळधार पावसात रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका अनोळखी व्यक्तीला तत्परतेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचविण्यास मोलाची मदत केली.
पनवेल शहर वाहतूक पोलीस हवालदार अभिमन्यू लाळगे आणि प्रदीप चव्हाण हे कर्तव्य बजावत असताना, जेएनपीटी ते पनवेलकडे जाणाऱ्या साई वर्ल्ड सिटी मार्गावर एक अनोळखी व्यक्ती मुसळधार पावसात भिजून रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्यांना मिळाली. माहिती मिळताच दोन्ही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला हलविले. तसेच, वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत परिसर सुरक्षित केला. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्या व्यक्तीला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित व्यक्तीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल क्रमांक 4 यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका अनोळखी नागरिकाचा जीव वाचविण्यास मोठी मदत झाली.






