वाट चुकलेल्या ट्रेकर्सना पोलिसांची मदत; तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या राजमाची परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांपैकी तिघेजण दुर्गम डोंगराळ भागात वाट चुकल्याची घटना घडली. कर्जत पोलिसांनी तत्परता, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवत अवघड परिस्थितीत शोधमोहीम राबवून तिनही ट्रेकर्सना सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील व्हीतराज नरेंद्रसिंग वाला, अनिरुद्ध शिवा सुब्रामनियन रामनाथ, आकाश राजेश यादव, आकाश जय सिंह आणि मीत धर्मेश ठक्कर असा पाच जणांचा ग्रुप राजमाची परिसरात ट्रेकिंगसाठी गेला होता. निसर्गरम्य पण अत्यंत दुर्गम अशा या भागात भटकंती करत असताना त्यापैकी तीन जण मुख्य गटापासून वेगळे पडले आणि त्यांनी चुकीचा मार्ग धरल्याने ते घनदाट जंगलात अडकले. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन सेवेद्वारे कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी बीट मार्शल कारकुड, पोलीस शिपाई संतोष खाडे, निर्मल आणि स्थानिक मदतगार अंकुश वरे आणि वाळकु निरगुडा यांची मदत घेतली.
या शोधमोहिमेदरम्यान, रात्रीचा अंधार, उंच-सखल डोंगराळ रचना, निसरडे मार्ग आणि जंगलातील धोकादायक परिस्थिती असूनही पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि संयमाने शोधकार्य सुरू ठेवले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांना वाट चुकलेल्या तिन्ही ट्रेकर्सचा शोध घेण्यात यश आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची खात्री करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना कर्जत पोलीस ठाण्यात आणून आवश्यक ती मदत देण्यात आली आणि पुढे त्यांच्या घरी रवाना करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत कर्जत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा विशेष उल्लेखनीय ठरली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा सदैव सज्ज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच, पर्यटकांनी अशा दुर्गम ठिकाणी ट्रेकिंग करताना योग्य मार्गदर्शक, सुरक्षितता साधने आणि पूर्वतयारी ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.







