भक्ती, शक्ती अन् निसर्गाचा संगम; चिरनेर ठरतंय पर्यटकांचे केंद्र बिंदू
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर हे गाव भक्ती, शक्ती आणि निसर्गाच्या त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक ठिकाणी पर्यटकांना अध्यात्म, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि सुंदर नैसर्गिक ठिकाणांचा अनुभव एकत्र घेता येतो. त्यामुळे पावसाळ्यात उरण, पनवेल आणि नवी मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यात चिरनेर गावात महागणपतीचे मंदीर आहे. दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षमय चिरनेर जंगल सत्याग्रह ही याच भूमीवर घडला होता. त्याचप्रमाणे येथील धरण डोंगर आणि निसर्ग याची उधळण झालेला हा परिसर आहे.
चिरनेरमध्ये पेशवेकालीन स्वयंभू महागणपतीचे भव्य व देखणे मंदिर आहे. अष्टविनायकांनंतर महाराष्ट्रात या गणपतीला मोठे स्थान असून, लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. कोकणातील उरण व कर्नाळा प्रांताचा कारभार नानासाहेबांचे सुभेदार रामजीपंत फडके यांनी चालविला. हा कारभार सांभाळताना त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. तसेच, देवळांचा जीर्णोद्धार केला. चिरनेर येथील गणपती मंदिर हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. आतील व बाहेरील रचनेवरून, पाषाणावरील कलाकुसरीचे मंदिराचे हे काम म्हणजे शिल्पकलेचा आणि वास्तुशास्त्राच्या बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. अशा या पेशवे कारकीर्दीत बांधलेल्या मंदिरातील महागणपतीची मूर्ती आज बहुजन समाजाची आराध्य देवता झाली आहे. मूर्ती भव्य व पूर्वाभिमुख असून शेंदूर चर्चित आहे. श्रींच्या उजव्या हातात परशु आहे. तर, दुसरा हात आशीर्वादाचा आहे. डावीकडील वरच्या हातात पाश, तर दुसऱ्या हातात मोदक आहे, डोक्यावर मुकुट दिसून येते. चिरनेरचा हा गणपती डाव्या सोंडेचा म्हणजे तो रिद्धीविनायक आहे. पूर्वी या गणपतीला कौल लावण्याची पद्धत होती. माघ वद्य चतुर्थीला श्रींच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम होतो. चिरनेर येथील गणपती मंदिराच्या सभा मंडपाचा उपयोग चिरनेर जंगल सत्याग्रहातील आरोपींना बंदिस्त ठेवण्यासाठी केला होता. चिरनेर परिसरातील सामान्य जनतेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास घडविला, त्यामागे गणपतीची प्रेरणा होती.
तसेच, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या भूमीने मोठी शक्ती दाखवली होती. 25 सप्टेंबर 1930 रोजी ब्रिटिशांच्या जंगल कायद्याविरुद्ध येथे प्रसिद्ध चिरनेर जंगल सत्याग्रह झाला. या आंदोलनात आठ ग्रामस्थ हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ अक्कादेवी जंगलात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर हिरवीगार वनराई, शेती आणि टेकड्यांनी वेढलेला उरणचा परिसर निसर्गाने नटलेला आहे. येथील अक्कादेवी बंधारा (धरण) आणि आजूबाजूचा परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.







