| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन कांदळगावकर यांच्या मातोश्री सुनीता कांदळगावकर यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचा आदर करत कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदान करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीला खरी श्रद्धांजली वाहिली.
सुनीता कांदळगावकर यांनी जिवंतपणीच आपल्या मुलाला, नितीन कांदळगावकर यांना मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा सांगितली होती. त्यांच्या निधनानंतर नितीन कांदळगावकर यांनी नवीन पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या आय बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर नेत्रदान पथक तत्काळ त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कॉर्नियाचे संकलन करण्यात आले. या कॉर्नियाचा उपयोग केराटोप्लास्टी (कॉर्निया प्रत्यारोपण) शस्त्रक्रियेसाठी केला जाणार आहे. त्यामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांना पुन्हा जग पाहण्याची संधी मिळणार आहे. मरणोत्तर नेत्रदानाचा सुनीता कांदळगावकर यांनी घेतलेला निर्णय सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेची पूर्तता करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. सुनीता कांदळगावकर यांच्या या प्रकाश देणाऱ्या श्रेष्ठ दानाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







