दिरंगाई झाल्यास ठेकेदारावर कारवाई
| चणेरा | प्रतिनिधी |
5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरुड-रोहा-कोलाड प्रमुख मार्गावरील उसरोली फाटा ते तळेखार फाटा दरम्यान रस्त्याचा मोठा भाग खचला होता. यानंतर 20 जुलैपासून हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि व्यावसायिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, दैनंदिन कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून बंद असलेल्या सुपेगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, ठेकेदाराने काम नियोजित वेळेत पूर्ण केल्यास येत्या सोमवार दि. 3 ऑगस्टपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे उपअभियंता अरुण पाटील यांनी दिली. सध्या क्षतिग्रस्त भागाचे खोदकाम, मजबुतीकरण आणि तात्पुरती दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण होताच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपअभियंता अरुण पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. मात्र, विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपासून रस्ता सुरू करून नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ता बंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांत विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.







