चार दिवसांपासून भला मोठा दगड रस्त्यावर; माती खचली, झाडे कोसळण्याचा धोका
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा-तांबडी मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक 50 हा पुन्हा एकदा गंभीर धोक्याच्या छायेत आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला असून, तो गेल्या तीन ते चार दिवसांपासून तसाच पडून आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मातीही रस्त्यावर घसरून आली आहे.
विशेष म्हणजे, डोंगराचा उर्वरित भाग अजूनही सैल अवस्थेत असल्याने आणखी मोठे दगड, माती तसेच झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धोकादायक परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याने वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. एखादा गंभीर अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर पडलेला दगड, खचलेली माती आणि वरून लोंबकळणारी झाडे यामुळे प्रत्येक प्रवास जीवघेणा ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात हा धोका अनेक पटींनी वाढत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
गेल्या वर्षीही याच डोंगरातून आठ ते नऊ ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. अनेक ठिकाणी झाडांसह प्रचंड दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्या घटनेतून प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून, संभाव्य दुर्घटनेची चाहूल लागूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या रस्त्याला अनेक ठिकाणी अद्याप साईड पट्टीच नसल्याने एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा धोकादायक परिस्थितीत वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. अशा परिस्थितीत जर अचानक दरड कोसळली किंवा झाड पडले, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता तातडीने घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी करावी, धोकादायक दगड, माती आणि झाडे तात्काळ हटवावीत तसेच कायमस्वरूपी दरड प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करा
रस्त्यावर चार दिवसांपासून पडलेला दगड, खचलेली माती आणि डोंगरावर लटकलेली धोकादायक झाडे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे; दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे करून मदतीची घोषणा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी संबंधित यंत्रणेवरच राहील.
आयआयटी मुंबईच्या जिओ-टेक्निकल तज्ज्ञांनी या डोंगराची पाहणी केली आहे. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांनुसार विभागामार्फत काम करण्यात येणार असून, आवश्यक मंजुरी मिळताच काम तातडीने सुरू करण्यात येईल. तसेच, रोहा-तांबडी रस्त्याच्या 4.850 किलोमीटर लांबीच्या सुधारणा कामासाठी चालू अर्थसंकल्पात सुमारे पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून, पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.
अरुण पाटील
उपअभियंता






