दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर खोल समुद्रातील मासेमारीला उत्साहात प्रारंभ
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
सागरी मत्स्यसंपदेचे संवर्धन आणि माशांच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी लागू करण्यात येणारी दोन महिन्यांची खोल समुद्रातील मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर पनवेलच्या कोळीवाड्यात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.1) पहाटेपासून गाढी नदी ते खाडी परिसरातून कोळी बांधवांनी आपल्या बोटी समुद्राच्या दिशेने रवाना करत नव्या हंगामाची सुरुवात केली.
गेल्या दोन महिन्यांपासून सर्व मासेमारी नौका किनाऱ्यावर उभ्या होत्या. या काळात कोळी बांधवांनी बोटींची दुरुस्ती, इंजिनांची देखभाल, जाळ्यांची बांधणी व आवश्यक साहित्याची तयारी केली होती. बंदी संपताच सर्व तयारी पूर्ण करून मच्छीमार पुन्हा समुद्रात उतरले. पहाटेच्या सुमारास कोळीवाड्यात मोठी लगबग पाहायला मिळाली. बोटींवर जाळी, बर्फ, इंधन आणि मासेमारीचे साहित्य चढविण्यात आले. अनुभवी मच्छीमारांसह तरुणांनीही नव्या हंगामासाठी उत्साहाने सहभाग घेतला.
गाढी नदीमार्गे खाडीकडे निघालेल्या अनेक बोटी दिवसभर मासेमारी करत होत्या. काही कोळी बांधवांच्या जाळ्यात विविध प्रकारची मासळी अडकल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या मासळीमुळे यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. मासेमारी पुन्हा सुरू झाल्याने पनवेलमधील स्थानिक मासळी बाजारातही चैतन्य निर्माण झाले आहे. ताजी मासळी उपलब्ध होण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
मच्छीमारांनी शासनाकडून डिझेल अनुदान, आधुनिक मासेमारी सुविधा, सुरक्षित धक्के आणि खाडी परिसरातील गाळ काढण्याची मागणीही यावेळी केली. वाढता इंधन खर्च आणि बदलते हवामान ही आव्हाने कायम असली तरी नव्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
समुद्रदेवतेचे स्मरण करून आणि सुखरूप परतण्याची प्रार्थना करत कोळी बांधवांनी समुद्राकडे प्रस्थान केले. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा गाढी नदी व खाडी परिसरात बोटींची वर्दळ वाढली असून, पनवेलच्या कोळीवाड्यात नव्या मासेमारी हंगामाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे.







