ठेकेदाराला वाचवण्यासाठी माथेरान नगरपरिषद धडपडतेय?
सत्ताधारी गटातूनच आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकचे संपूर्ण पाणी 3 ऑगस्ट रोजी सोडण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. तलावातील गाळ पाण्यासोबत बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पालिकेचे म्हणणे असले, तरी ठेकेदाराला वाचवण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा थेट आरोप माजी नगराध्यक्ष तथा सत्ताधारी गटाचे स्वीकृत नगरसेवक आणि शिवसेना शहरप्रमुख मनोज खेडकर यांनी केला आहे.
शार्लोट लेकमधील गाळ गेल्या 12 वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन व उपोषणही केले होते. दरम्यान, अमृत-2 योजनेतून सुमारे पाच कोटी रुपयांचे तलाव संवर्धनाचे काम सुरू असून, ठेकेदाराला सुमारे 2600 ट्रक गाळ काढणे अपेक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, गाळ काढण्याचे काम झाले नसतानाही ठेकेदाराला बिल अदा करण्यात आल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. आता तलाव तुडुंब भरलेला असताना पाणी सोडल्यास गाळही वाहून जाईल आणि ठेकेदाराच्या कामातील त्रुटी झाकल्या जातील, असा आरोप त्यांनी केला आहे. ठेकेदाराला वाचवण्यासाठी आणि निधीचा अपव्यय करण्यासाठीच पाणी सोडले जात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मनोज खेडकर यांनी समाजमाध्यमांवर घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे शार्लोट लेकच्या संवर्धनाच्या कामावरून सुरू असलेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
मोरबे धरणाचे अधिकारी आता कुठे?
शार्लोट लेकमधील पाणी तीन वर्षांपूर्वी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नवी मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला होता. मग आता पाणी सोडण्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच मोरबे धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची याबाबत भूमिका काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयापूर्वी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला आहे का, याचा खुलासा पालिकेने करावा, अशी मागणी होत आहे.







