। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
पनवेल न्यायालयाच्या आवारात रिमांडसाठी आणलेल्या आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून एका पोलिसावर हल्ला केला. तसेच पोलिसांच्या तोंडावर लाथ मारून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदीक अख्तर मोहम्मद खान (रा. कल्याण रोड, भिवंडी) याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सादिक खान याला बुधवारी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास रिमांडसाठी पनवेल न्यायालयात खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हजर करत होते. पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक केली होती. यावेळी त्याच्या नातेवाईकांना कोर्टाच्या आत येऊन न दिल्याच्या रागातून आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस पथक आणि पोलीस हवालदार यांना शिवीगाळ केली. तसेच, एका पोलीस हवालदाराने त्याला पकडून ठेवण्याचा राग आल्याने त्याने पोलिसाच्या तोंडावर लाथ मारली आणि सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी आरोपीविरोधात विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







