सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीजवळ बुधवारी सकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. या अपघातामध्ये सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. ट्रकच्या धडकेत स्कुटीमधील तरुणी तसेच रस्त्याच्या बाजूला कलंडलेल्या एसटी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन्ही अपघात काही अंतरावर घडले.
मिळालेल्या माहितीनुसार मुरूड आगारातील एसटी बस अलिबाग स्थानकातून बुधवारी (दि.12) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंंबईकडे निघाली. अलिबाग-पेण मार्गावरून ही बस जात होती. दरम्यान सागाव जवळ आल्यावर चालकाचा बसमधील ताबा सुटला. त्यामुळे एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. सुदैवाने बाजूला असलेल्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र एसटीतील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही तासानंतर कार्लेखिंड येथून उसरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकची पुढे स्कूटीला मागून धडक लागली. त्यामध्ये स्कूटीमधील तरुणी जखमी झाली. सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. मात्र ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकही रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या दोन वेगवेगळ्या अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रकच्या धडकेने जखमी झालेल्या तरुणीला कार्लेखिंड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. मात्र मोठा अनर्थ टळला असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.






