| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवी मुुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक धर्मराज सोनके, उत्कृष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या पदकासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. रायगड पोलीस दलातदेखील कित्येक वर्षे त्यांनी सेवा केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धर्मराज सोनके हे 2010 पासून महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना दहिसह पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून काम केले. वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड केले आहे. पुणे येथे विशेष सुरक्षा विभागासह रायगड पोलीस दलातदेखील त्यांनी सेवा केली आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडले. दरम्यान महाराष्ट्रात पहिल्यांदाच समाधान कक्ष येथे पोलीस हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर दिघी सागरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार हाती घेतल्यावर आयएसओ मानांकन प्राप्त म्हणून रायगडमधील पहिले पोलीस ठाण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.
दिघी सागरी पोलीस ठाण्यातील सागरी सुरक्षेसह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. पर्यटकांसाठी पहिल्यांदा पर्यटक हेल्पलाइन चालू केली होती. तसेच मच्छीमार बांधव यांच्याशी समन्वय साधून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक कार्य त्यांनी केले. मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत असताना पर्यटकांची सुरक्षितता, आणि सागरी मार्गाने येणाऱ्या ये – जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. अजंठा बोट दुर्घटनामधील 79 प्रवासी वाचवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यानंतर ते ठाणे ग्रामीण पोलीस दलातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षा राखण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यानंतर ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कामे केले. 2025 पासून ते नवी मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी 15 सापळा कार्यवाही करून 26 लाचखोरांविरोधात कारवाई केली आहे. त्यामध्ये वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही केली आहे. अतिक्रमण उप आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, अपर जिल्हाधिकारी सिडको, जॉईंट सेक्रेटरी-शिक्षण विभाग, सहाय्यक आयुक्त जीएसटी विभाग यांच्याविरोधातदेखील लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. धर्मराज सोनके यांनी पोलीस दलामध्ये आतापर्यंत 16 वर्षे सेवा केली आहे. या कालावधीत केलेल्या त्यांच्या कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांची उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड केली आहे.







