| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहराला लागून असलेल्या हालिवली गावामध्ये स्थानिकांची वाट खड्डेमय रस्त्याने सुरु होत असून, पुढे अस्ताव्यस्त पडलेला कचरा हि मोठी समस्या बनली आहे. तसेच, ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हालीवली परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, हालीवली परिसरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कागद, घरगुती कचरा व इतर घनकचरा उघड्यावर टाकण्यात आलेला दिसून येत आहे. कचऱ्याचे ढीग वाढत असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यासोबत कचरा परिसरात पसरत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. या समस्येकडे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती, खड्ड्यांची डागडुजी, नियमित कचरा संकलन आणि कचरा टाकण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







