ठेकेदाराला 90 टक्के बिल; काम अपुरे ठेवून अभय दिल्याचा आरोप, लोकप्रतिनिधींविरोधात माथेरानकरांचा संताप
| माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरानच्या ऐतिहासिक शार्लोट लेकच्या गाळमुक्तीच्या कामावरून आता कोट्यवधी रुपयांचा संशय गडद झाला आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या कामात ठेकेदाराला तब्बल 90 टक्के रक्कम अदा करण्यात आली असतानाही अपेक्षित काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ‘चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?’ असा थेट सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शारलोट लेकच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारच्या अमृत-2.0 अभियानांतर्गत पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. शासनाच्या कागदपत्रांनुसार या प्रकल्पात तलावातील गाळ काढणे, त्याची वाहतूक करून योग्य ठिकाणी साठवणूक करणे तसेच तलावाच्या इतर कामांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही शार्लोट लेकमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे आणि गाळमुक्तीचे काम रखडल्याचे वृत्त समोर आले आहे. 2026 मध्येही तलावातील गाळ न काढताच बिले अदा केल्याच्या आरोपावरून हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
निविदेतील अटींनुसार मोठ्या प्रमाणात गाळ काढून त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी ठेकेदारावर होती. मात्र, काम अपुरे असतानाही मोठ्या प्रमाणात बिल अदा करण्यात आल्याचा आरोप होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काम अपुरे, बिल मात्र जवळपास पूर्णमग जबाबदार कोण? असा सवाल माथेरानकर विचारत आहेत.
शार्लोट लेक हा माथेरानच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. तलावात गाळ साचल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी होत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. 2026 मध्ये माथेरानमध्ये पाणीटंचाईच्या प्रश्नावरही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. दरम्यान, तलावातील पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे गाळ वाहून जाण्याची शक्यता आणि त्याचा गाळमुक्तीच्या कामावर होणारा परिणाम याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून आतापर्यंत काढलेल्या गाळाचे प्रमाण, केलेली वाहतूक, अदा केलेली रक्कम आणि निविदेतील अटींची पूर्तता यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिकांच्या मते, माथेरानच्या पर्यटनाबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या तलावाशी जोडलेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही तलावाची स्थिती सुधारत नसेल, तर या निधीचा नेमका विनियोग कुठे झाला, याचा हिशेब जनतेसमोर मांडला पाहिजे. ठेकेदाराला अभय देणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी, अपूर्ण कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे. शारलोट लेकच्या गाळाचा हा प्रश्न आता केवळ तलावाच्या स्वच्छतेपुरता राहिलेला नसून कोट्यवधींच्या सार्वजनिक निधीच्या पारदर्शकतेचा प्रश्न बनला आहे.
दरवर्षी आम्ही पावसाळ्यात याठिकाणी केवळ लेकच्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येतो. परंतु इथल्या कोरड्या लेकची परिस्थिती पाहून डोके अक्षरशः चक्रावून गेले. आमच्या आनंदावर विरजण पडल्यामुळे आमचे सर्व सहकारी नाराज झाले आहेत.
नवनाथ शिर्के,
पर्यटक, मुंबई
आपली अनमोल किंमतीची गाळयुक्त माती या लेकमधून खाली सोडण्यात आली आहे. खाली मोरबे धरणात हा गाळ जाणार असल्याने आपल्याला यापुढे रस्त्यांची कामे करताना माती मिळणार नाही. आपले पर्यावरण, निसर्ग यामुळे इथे पर्यटक येत असतात. ठेकेदाराने यापुढे माती पाण्यात सोडून देऊ नये. आमच्या गावासाठी या मातीची खूपच गरज आहे
मेहुल राकेश कोकळे,
माथेरान







