सहा आरोपी निष्पन्न; सुमारे 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, कार व 12 हजारांची रोकड जप्त
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात झालेल्या दोन घरफोडींचा छडा लावण्यात महाड शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग यांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत कारवाई केली. या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून, उपलब्ध माहितीनुसार पाच आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यांच्याकडून सुमारे 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, चारचाकी वाहन आणि 12 हजारांची रोकड असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
25 जुलै ते 27 जुलैदरम्यान प्रभात कॉलनीतील रानशिल्प बंगला येथे घरफोडी झाली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा व कुलूप तोडून प्रवेश केला. बेडरूममधील कपाट, बेडच्या आतील भाग तसेच स्टेअर रूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले. याप्रकरणी शोभा रविकांत शेट (63) यांच्या फिर्यादीवरून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2026 दाखल करण्यात आला.
यानंतर 26 जुलैच्या सायंकाळपासून 27 जुलैच्या सकाळपर्यंत प्रभात कॉलनीतील गणराज निवास येथेही घरफोडी करण्यात आली. प्रकाश धर्मा धाटावकर (55) यांच्या घरातील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील कपाटाचे लॉक तोडून गोडरेजचा लोखंडी लॉकर उचकटण्यात आला, तर दुसऱ्या मजल्यावरील कपाटातील चांदीच्या वस्तू चोरी करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 113/2026 दाखल करण्यात आला.
दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी अनोळखी असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने महाड व पोलादपूर तालुक्यातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांच्या हालचाली, वाहन क्रमांक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीतील सहभाग उघड झाला.
या प्रकरणात सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (32), रा. शनिनगर, विठ्ठल मंदिराजवळ, पंढरपूर; गणेश उर्फ सोन्या शंकर शिंगाडे (30), रा. महावीर नगर, वडार गल्ली, पंढरपूर; किरण सतीश गोसावी (28), रा. सावरकर चौक, तनपुरे महाराज मठाशेजारी, पंढरपूर; सारंग संजय टोळे (29), रा. तानाजी चौक, पंढरपूर; तसेच नितीन गुलाब मदने (29), रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोपींकडून 4.407 किलो चांदीचा पाता, 1.939 किलो चांदीचा पाता, 22.530 ग्रॅम सोन्याचा कच्चा लड, 1.086 किलो चांदीचा पाटा आणि सुमारे 1 किलो चांदीचा पाता असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी एर्टिगा (एमएच-15-जीएक्स-2000) ही कारही जप्त करण्यात आली आहे. एकूण सुमारे 8 किलो चांदी व 3 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून महाड शहर पोलीस ठाण्यातील आणखी दोन गुन्ह्यांची माहिती समोर आली. गुन्हा क्रमांक 101/2026 मध्ये किरण सतीश गोसावी व सारंग संजय टोळे यांचा सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणात 5 ग्रॅम वजनाची सुमारे 25 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी तसेच सुमारे 4 हजार रुपये किमतीची आणखी एक सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्हा क्रमांक 35/2026 मध्ये गणेश उर्फ सोन्या शंकर शिंगाडे व नितीन गुलाब मदने यांचा सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणात 200 रुपयांच्या 60 नोटा, म्हणजेच 12 हजार रुपये रोख, जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सपोनि मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक, पोलीस अंमलदार मनीष भोईर, रामसेवक कांबळे, प्रतीक कदम, आंधळे, मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा अलिबागचे पोलीस उपनिरीक्षक निवाळकर, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे, मनोहर सिरतार, सचिन वावेकर, तुषार धरत, प्रदीप खरात, ईश्वर लंबोटे, अक्षय जगताप, प्रशांत लोहार आणि सायबर सेल अलिबाग यांच्या पथकाने ही कारवाई केली.







