| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नारळी पौर्णिमेचा सण जवळ आल्याने पनवेलमधील गाढी नदीकाठच्या कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली असून, नदीकिनारी उभ्या असलेल्या होड्यांची स्वच्छता व सजावट करण्याची लगबग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर कोळी समाजातील महिलांमध्येही सणाचा उत्साह दिसून येत आहे. एका कोळी भगिनीने पारंपरिक कोळी साडी परिधान करून गाढी नदीकिनारी छायाचित्रण केले. पारंपरिक दागिने आणि आकर्षक वेशभूषेमुळे तिचे रूप विशेष लक्षवेधी ठरले. नदीतील होड्या, गाढी नदीचा शांत परिसर आणि पारंपरिक वेशभूषा यांमुळे छायाचित्राला विशेष सौंदर्य प्राप्त झाले.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा महत्त्वपूर्ण पारंपरिक सण मानला जातो. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित व सुखरूप मासेमारीसाठी प्रार्थना केली जाते. पावसाळ्यानंतर मासेमारीचा हंगाम सुरू करण्यापूर्वी समुद्रपूजा करण्याची परंपरा आहे. या सणातून कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि जीवनशैलीचे दर्शन घडते. गाढी नदीकाठचा कोळीवाडा यानिमित्ताने पुन्हा एकदा पारंपरिक रंगात रंगणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर कोळी समाजातील महिला, पुरुष आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पारंपरिक वेशभूषा, सजवलेल्या होड्या आणि नदीकिनारा यांमुळे परिसराला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.







