| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची अपेक्षा असताना, श्रीवर्धन आगारातील एका वाहकाने माजी सैनिकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी प्रशासनाकडून अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन येथील रहिवासी माजी सैनिक तथा ज्येष्ठ नागरिक दिलीप पडवळ हे श्रीवर्धन आगाराच्या श्रीवर्धन-बोरिवली या सकाळी 8:30 वाजताच्या बसने प्रवास करत होते. पडवळ हे बसमधील 7 आणि 8 क्रमांकाच्या अनारक्षित आसनावर बसले होते. प्रवास सुरू असताना मागील आसनांचे आरक्षण असलेले दोन प्रवासी बसमध्ये चढले. मात्र, मागील आसने ओली आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने त्या प्रवाशांनी वाहकाला पुढे बसवण्याची विनंती केली. त्यावर वाहकाने बस मधील काही आसने रिकामी असून देखील दिलीप पडवळ यांना त्या आसनावरून उठवून मागील आसनांवर जाऊन बसण्यास सांगीतले. मागे आसनांची दुरवस्था आणि ती ओली असल्याने पडवळ यांनी तेथे बसण्यास नकार दिला. यावेळी वाहकाने “आम्ही सांगू तिथे बसा, नाहीतर गाडीतून खाली उतरा“ असे उद्दामपणे सांगितले. यावेळी बसमध्ये उपस्थित असलेल्या श्रीवर्धन नगरपरिषदेच्या नगरसेविका सुप्रिया चोगले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. या संपूर्ण प्रकारामुळे माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी सुप्रिया चोगले यांनी श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांकडे तक्रार अर्ज सादर केला असून, संबंधित मुजोर वाहकावर त्वरित कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.







