चांद्रयान-3च्या यशाची विद्यार्थ्यांना प्रेरणा; जिल्हा परिषद शाळेला नवी ओळख
| चौल | प्रतिनिधी |
आकाशाकडे पाहताना केवळ तारे मोजण्याऐवजी भविष्यात त्यांना गवसणी घालण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद आयएसओ मानांकित उच्च प्राथमिक शाळा, हटाळे येथे तब्बल साडेनऊ फूट उंचीचे भव्य रॉकेट मॉडेल उभारण्यात आले आहे. चांद्रयान-3च्या ऐतिहासिक यशाची आठवण जपतानाच ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाची जिज्ञासा निर्माण करणारा हा अभिनव उपक्रम ठरला आहे.
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर हटाळे शाळेच्या परिसरात रॉकेट मॉडेल उभारून विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांनी दिली. रॉकेट मॉडेलचे अनावरण शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रश्मी भोपी यांच्या हस्ते झाले. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा, विद्यार्थी संघाचे सदस्य व उद्योजक सुरेश गायकवाड, नागाव व चौल केंद्रातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान शिकायचे नाही, अनुभवायचे!
केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देताना विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर, प्रोपल्शन मॉड्यूल तसेच भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती याबाबत मार्गदर्शन केले.
अवकाश विज्ञान विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि संशोधन वृत्तीला चालना देणारे प्रभावी माध्यम आहे. आज निर्माण झालेले कुतूहल उद्याच्या संशोधकाला जन्म देऊ शकते, असे डॉ. वारगे यांनी सांगितले.
तारांगणातून विश्वाची सफर
रॉकेट मॉडेलसोबतच शाळेत विकसित करण्यात आलेल्या ‘तारांगण’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, नक्षत्रे, आकाशगंगा आणि अंतराळातील विविध घटनांची माहिती अनुभवातून मिळणार आहे. पाठ्यपुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष अनुभवाशी जोडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, प्रश्न विचारणे, प्रयोग आणि वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची सवय लागणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकाशाची उंची
हटाळे शाळेतील हा उपक्रम केवळ शाळेच्या परिसराची शोभा वाढविणारा नाही, तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची स्वप्ने रुजविणारा प्रयत्न आहे. रॉकेट मॉडेल, तारांगण, विज्ञान प्रयोग आणि खगोल निरीक्षण अशा उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ओढा वाढण्यास मदत होऊ शकते.







