13 वर्षांनंतर संघ अंतिम सामन्यात; दुसऱ्या उपांत्य फेरी विजेत्याशी पडणार गाठ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ईस्ट झोन संघाने दुलीप ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्यामध्ये 13 वर्षांनंतर प्रवेश केला आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोनने पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट्रल झोनचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात 7 बळी घेणाऱ्या मुकेश कुमारला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. आता अंतिम सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये ईस्ट झोनची गाठ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या (नॉर्थ झोन विरुद्ध साऊथ झोन) विजेत्या संघाशी पडणार आहे.
दुलीप चषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सेंट्रल झोनने पहिल्या डावात 266 धावा केल्या. या डावात रिंकू सिंगने सर्वाधिक 60 धावा केल्या, तर आर्यन जुयालने 46 धावा केल्या. याशिवाय, यश ठाकुरने नाबाद 30 धावांची खेळी केली. ईस्ट झोनकडून मुकेश कुमार आणि अभिजीत सरकार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कौनेन कुरैशी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तर देताना ईस्ट झोनचा पहिला डावही 266 धावांत आटोपला. ओपनिंग जोडी म्हणून वैभव सूर्यवंशीने अभिमन्यू ईश्वरनसह 153 चेंडूंमध्ये 162 धावांची भागीदारी केली. वैभव 81 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला, तर अभिमन्यूने 8 चौकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. विरोधी संघाकडून हर्ष दुबेने 4 गडी बाद केले, तर आर्यन पांडे आणि यश ठाकुर यांना प्रत्येकी 3-3 बळी मिळवले.
सेंट्रल झोनचा दुसरा डाव 158 धावांवर संपला. या संघाने 97 धावांपर्यंत 8 गडी गमावले होते, त्यानंतर अरशद खानने हर्ष दुबेसोबत 43 धावांची भागीदारी करत संघाला लाजीरवाण्या स्थितीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हर्ष 3 चौकारांसह 24 धावा करून बाद झाला. या डावात मुकेश कुमारने 44 धावा देऊन 4 बळी घेतले. तसेच, मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. तर, अभिजीत सरकार, अनुकूल रॉय आणि कौनेन कुरैशी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. त्यानंतर सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ईस्ट झोनने 39.3 षटकांत सामना जिंकला. सूर्यवंशीने ईश्वरनसोबत 85 चेंडूंमध्ये 61 धावा करून संघाला मजबूत सुरुवात करून दिली. वैभव 43 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुमार कुशाग्रने मोर्चा सांभाळला. त्याने विराट सिंगसोबत 28 धावा आणि कॅप्टन ईशान किशनसोबत 31 धावांची भागीदारी करत संघाला 124 धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर अनुक्रमे कुशाग्र (22) आणि अनुकूल रॉय (0) बाद झाले. मात्र, कर्णधार ईशान मैदानात टिकून राहिला, त्याने 41 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी हर्ष दुबेने 4 बळी घेतले, तर सारांश जैन आणि यश ठाकुर यांना प्रत्येकी 1 बळी घेतला.







