| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी दिल्लीत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. काश्मिरी गेट परिसरातील एका स्लीपर बसमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणात बसच्या चालक आणि वाहकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कुटुंबीयांवर नाराज होऊन कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती. नोएडामध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत भावाकडे ती जात होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. याचदरम्यान एक रिकामी स्लीपर बस तेथून जात होती. विद्यार्थिनीने बस थांबवण्यासाठी हात केला. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने बस थांबवून तिला नोएडा सेक्टर-63 येथे जाण्याचे सांगत बसमध्ये बसवले.
बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने पीडित विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर चालक आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशिरा कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोडवर विद्यार्थिनीला उतरवून तेथून फरार झाले. या घटनेने राष्ट्रीय राजधानीतील सार्वजनिक वाहतुकीत महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडूनच असे कृत्य घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







