| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथील मैनुशेठ वाडा येथील हर्षवी पाटील या पाच वर्षीय चिमुरडीचा मंगळवारी (दि.1) सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवी पाटील ही आजोबांसोबत दुसऱ्या घरात झोपली होती. सायंकाळच्या सुमारास तिचे आजोबा काही वेळासाठी उठून गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या सापाने हर्षवीला दंश कल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही वेळाने तिची आजी तिला उठविण्यासाठी गेल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला अलिबाग येथील एका खासगी रुग्णालयात आणले. मात्र, सुरूवातीला हर्षवीला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते. प्रकृतीत सुधारणा न होता तोंडाला फेस येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, सर्पदंशाची पूर्ण माहिती वेळेत स्पष्ट न झाल्याने उपचारात अडथळा निर्माण झाला. त्यामळे हर्षवी पाटील हिचे निधन झाले.







